वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे मोटारसायकल चालवून रस्ता क्रॉस करणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीला धडक देत त्यावरील गुरुनाथ कृष्णा कळंगुटकर (73,रा.भोके आंबेकरवाडभ्,रत्नागिरी) या वृध्द चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारसायकल चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार 11 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वा.सुमारास हातखंबा ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावर भोके आंबेकरवाडी फाटा येथे घडली होती.
अरझान मुस्ताक काझी (33,रा.कळंबस्ते,संगमेश्वर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मोटारसायकल चाकलाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी गुरुनाथ कळंगुटकर हे शनिवारी सायंकाळी आपल्या ताब्यातील ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच-08-टी-0437) घेउन भोके ते खेडशी जात होते. त्याच सुमारास अरझान काझी आपल्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच्-08-एएच-9554) वर पाठीमागे पत्नीला बसवून भरधाव वेगाने हातखंबा तिठा ते निवळीच्या दिशेने जात होता. दरम्यान, गुरुनाथ कळंगुटकर हे भोके आंबेकरवाडी फाटा येथे आले व दुचाकीने रस्ता क्रॉस करुन पलीकडे जात असताना अरझानच्या भरधाव मोटारसायकलची धडक त्यांच्या दुचाकीला मध्यभागी बसून हा भिषण अपघात झाला होता.