चिपळूणमधील आणखी एक संशयित ‘एटीएस’कडून ताब्यात
चिपळूण : पाकिस्तानी गँगस्टर आणि दहशतवादी शहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय अल्पवयीन तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिपळूण येथे ‘एटीएस’च्या पथकाने धडक कारवाईत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्क चिपळूणच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘एटीएस’ने राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गुप्त मोहीम हाती घेतली आहे. एटीएसच्या १४ युनिटमधील तब्बल ५८ पथकांनी राज्यात दीडशेहून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबविली. प्राथमिक तपासात मोस्ट वॉन्टेड शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार सोशल मीडियावरून भारतीय तरुणांशी संपर्क साधत होते.
हे नेटवर्क संवेदनशील सामाजिक-धार्मिक मुद्द्यांचा गैरवापर करून तरुणांचे मतपरिवर्तन (ब्रेनवॉश) करत होते. ऑनलाइन प्रचार आणि वैयक्तिक चॅटिंगद्वारे तरुणांना राष्ट्रविरोधी विचारांकडे ढकलण्याचा हा एक सुनियोजित कट असल्याचे तपासातून पुढे आले आहे. तो विशेषतः अल्पवयीन मुलांना हेरगिरी व घातपातासाठी जाळ्यात ओढत असावा, असा अंदाज आहे.
संशयित अन्य जिल्ह्यातील
एटीएसने ताब्यात घेतलेले तरुण चिपळूणमध्ये राहत असले तरी, ते स्थानिक नाहीत. कामाच्या निमित्ताने ते चिपळूणमध्ये आलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जळगावमधील संशयिताच्या संपर्कात आले. त्यामुळे एटीएसने त्यांना ताब्यात घेतले.