विनायक राऊत यांचे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात
सून गिरीजा राऊत यांनी केले अघोरी विद्येचे गंभीर आरोप; गुन्हा दाखल
ठाणे (प्रतिनिधी):
शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र व नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून, यात कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ कलमे लावण्यात आली आहेत.
आज माध्यमांशी बोलताना गिरीजा राऊत यांनी गेल्या सात वर्षांतील आपला ‘मानसिक आणि शारीरिक छळ’ चव्हाट्यावर आणला. त्या म्हणाल्या, “माझ्या पतीचे वैयक्तिक आयुष्य लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी मला सात वर्षे अघोरी उपचारांच्या नावाखाली छळले. मला विविध बाबांकडे नेले जायचे, तिथे माझ्या अंगावरून जिवंत कोंबडे उतरवणे, अंगावरचे केस ओढणे, मांसाचे तुकडे वापरून उतारे करणे, कच्चे गोमूत्र आणि उदी पाजणे असे प्रकार घडवून आणले गेले.”
त्यांनी पुढे आरोप केला की, लग्नावेळी खोट्या माहितीच्या आधारे फसवणूक करण्यात आली. राजकीय प्रतिष्ठेच्या नावाखाली मला धमकावले जायचे आणि माझ्यावर सातत्याने मानसिक दबाव ठेवण्यात आला. “मी सासरी सुखाचा संसार करण्यासाठी गेले होते, पण त्यांनी मला ‘ट्रॅप’मध्ये अडकवून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझ्या आणि माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. गितेश आणि गिरीजा गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत नाहीत आणि सध्या त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे,” असे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत यांनी पुढे दावा केला की, “गिरीजा राऊत यांनी यापूर्वी आम्हाला नोटीस पाठवून दरमहा ५ लाख रुपये खर्च, १० कोटी रुपये रक्कम, २ कोटी रुपये मानसिक नुकसान भरपाई, ५ खोल्यांचे घर आणि महागड्या गाडीची मागणी केली होती. या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळेच त्यांनी आता सूडबुद्धीने ही तक्रार केली आहे. आम्ही अशा कोणत्याही अघोरी कृत्यात मानत नाही आणि या आरोपांचे आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्ही या प्रकरणी कायदेशीर लढा देऊ,” असेही त्यांनी नमूद केले.
एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या घरातील हा कौटुंबिक वाद आता पोलीस तपासापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कापूरबावडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, दोन्ही बाजूंच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.