निवडणूक कामात रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात डंका
प्रभावीपणे डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा गौरव
रत्नागिरी:
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदार यादीतील ‘एन्युमरेशन फॉर्म’चे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, चिपळूण तालुक्यातील ‘टेरव (बु.)’ गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपले काम १०० टक्के पूर्ण केले असून, हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या डिजिटायझेशनमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने आपली छाप पाडली आहे. राज्यातील पहिल्या ३० क्रमांकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला आहे. यामध्ये दापोली मतदारसंघ सहाव्या, चिपळूण नवव्या, गुहागर १९ व्या, तर राजापूर २७ व्या क्रमांकावर आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरती अमित घस्ते (बीएलओ, कोंडभुजबल, चिपळूण), सुप्रिया किसन लोखंडे (बीएलओ) आणि मधुरा विश्वनाथ साळवी (सहाय्यक अंगणवाडी ताई टेरव बु., चिपळूण),
चेतन कुंडलिक मेहेर (बीएलओ) आणि सीमा धुळप (पर्यवेक्षक खालगाव, रत्नागिरी) या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि नायब तहसीलदार दीपक चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या सर्वांच्या कार्याचे कौतुक केले. टेरव बु. गावाने १०० टक्के डिजिटायझेशनचे काम पूर्ण करून संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मतदार नोंदणी आणि यादीतील अद्ययावतीकरणासाठी हे डिजिटल काम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.