‘आरजू’च्या गुंतवणूकदाराचा आत्मदहनाचा इशारा
रत्नागिरी
आरजू कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना गेल्या तीन वर्षांपासून न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करत विलास वामन सुर्वे (रा. मुचरी, ता. संगमेश्वर) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःसह सर्वांसमक्ष आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विलास सुर्वे यांनी म्हटले आहे की, आरजू कंपनीच्या फसवणूक प्रकरणी गेली तीन वर्षे न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र, अद्याप फसवणूकग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. या काळात उपोषणासह विविध मार्गांनी आंदोलन करूनही केवळ आश्वासनेच मिळाली असून, संबंधितांवर प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फसवणूक करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करावा आणि त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत. तसेच, जोपर्यंत फसवणूकग्रस्तांचे पैसे परत मिळत नाहीत, तोपर्यंत संबंधित आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
पुढील १५ दिवसांत प्रशासनाने या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विलास वामन सुर्वे यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या इशाऱ्यामुळे आरजू कंपनीच्या फसवणूक प्रकरणाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे फसवणूकग्रस्तांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.