खेड तालुक्यातील जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
खेड :- तालुक्याच्या पूर्व भागात काेसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, रविवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमाराला पाणी पातळी ९.८० मीटरपर्यंत पाेहाेचली. पाणी पातळीत वाढ हाेत असल्याने खेड शहराला पुराचा धाेका निर्माण झाला. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला .
तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जाेर वाढल्याने जगबुडी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ हाेत आहे. पावसाचा जाेर वाढल्याने रविवारी सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ जगबुडी नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली हाेती. नदीची इशारा पातळी ५ मीटर, तर धोका पातळी ७ मीटर आहे. मात्र, सायंकाळी पाण्याची पातळी ९.८० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. सकाळीच नदीने धाेका पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क झाले हाेते. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून, नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागले . त्यामुळे नदीकाठावरील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली , तसेच खेड-खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला . पुरामुळे नदीकाठावरील स्मशानभूमी, तसेच काही वीटभट्ट्याही पाण्याखाली गेल्या . नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच खेड-खाेपी-धामणंद मार्गावर भूस्खलन झाले असून, कासई शिंदेवाडीजवळ दरड काेसळून वाहतूक ठप्प झाली . त्याचबराेबर चाेरद नदीलाही पूर आला असून, पुराचे पाणी बाेरघर आदिवासी वाडीत घुसले . त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान विभागाने पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच परिस्थिती गंभीर झाल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.