सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
रत्नागिरी:
हवामान विभागाने वर्तवलेला ‘ऑरेंज अलर्ट’ आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, दिनांक ०६/०७/२०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील ‘जगबुडी’ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर चिपळूण येथील ‘वाशिष्ठी’ नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या हेतूने प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.