ग्राहक पंचायत रत्नागिरी आयोजित रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमास नवनिर्माण कॉलेज येथे विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद
रत्नागिरी : सध्या पावसाळी वातावरण असून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने वाहन चालवणाऱ्या युवक आणि युवतींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने ग्राहक पंचायत रत्नागिरी आणि विभागीय परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने रस्ता सुरक्षा म्हणजे काय आणि अपघात टाळण्यासाठी काय करावे याबाबतचा प्रबोधनात्मक कार्यक्रम नवनिर्माण कॉलेज च्या माध्यमातून आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री राजवर्धन करपे यांच्या मार्गदर्शनाने विशेष उपक्रम राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमाला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच परिसरातील नागरिकही या कार्यक्रमास उपस्थित होते.
वाहन निरीक्षक श्री पाटील आणि श्री शिंदे यांनी दृक श्राव्य चित्रफिती, फोटो यांच्या माध्यमातून अपघातांची तीव्रता आणि ते कसे होतात याची माहिती सविस्तरपणे दिली. हे अपघात पुरेशी दक्षता घेतली तर टाळण्यासारखे असतात. वाहतुकीचे नियम पाळल्यास आपण स्वतः आणि अन्य प्रवासी सुरक्षित राहू शकतात याबाबत केलेले प्रबोधन सर्वांच्या लक्षात राहण्यासारखे ठरले.
रस्ता अपघातामध्ये सुमारे 24% अपघात एक कोणतेही वाहन न वापरणाऱ्या म्हणजेच पादचाऱ्यांच्या बाबत घडत असल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले आणि रस्त्यावरून चालतांनाही उजव्या बाजूने आणि इतर सर्व नियमांचे पालन करून चालणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमा मागील भूमिका श्रद्धा ताई कळंबटे यांनी विशद केली तर फैयाज खतीब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्य संजय गव्हाळे, उल्हास सप्रे तसेच पर्यवेक्षक सुकुमार शिंदे, ग्राहक पंचायत चे संजय वैशंपायन, अनंत भडकमकर, गोविंद गाडगीळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मालगुडकर यांनी तर कार्यवाह सत्यवान कोत्रे यांनी आभार व्यक्त केले.