संगमेश्वरमध्ये अवैध दारूसाठ्यावर कारवाई
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
संगमेश्वर:
मौजे कसबा वाडाठिकाण परिसरात अवैध दारूचा साठा करून उघडपणे सेवन करणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी रात्री ८:२५ च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना, कसबा वाडाठिकाण येथील एका घराच्या पाठीमागील पर्त्याचे शेडजवळ शशिकांत सिताराम हैबत (वय ६५) हा इसम मद्यपान करताना मिळून आला. त्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा करून ठेवला होता.
पोलिसांनी आरोपीकडून विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या आणि बिअरचे टीन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल देशी दारू (संत्रा),लंडन पिल्सनर स्ट्रॉन्ग बिअर, किंगफिशर स्ट्रॉन्ग बिअर, कांगारो १०००० स्ट्रॉन्ग बिअर याप्रमाणे एकूण ३,८४० रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विवेक श्रीधर रसाळ यांनी फिर्याद दिली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.