खानू येथे ट्रेलरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जखमी
रत्नागिरी:
रत्नागिरी ते करंजारी मार्गावर पटेल सॉमिल समोरील रस्त्यावर ट्रेलर आणि ओमनी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले असून, याप्रकरणी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ जून रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. फिर्यादी शोएब अख्तर मजीमुल्ला खान (वय २४) हे आपल्या कुटुंबासह ओमनी गाडीने (एमएच ०७ एच ००२१) रत्नागिरीवरून करंजारीच्या दिशेने जात होते. दरम्यान, खानू येथील पटेल सॉमिलसमोर आले असता, समोरून आलेल्या ट्रेलरने (क्रमांक आरजे २७ जीडी ३५८७) अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता, हलगर्जीपणे आणि भरधाव वेगाने मागे घेत ओमनी गाडीला जोराची धडक दिली.
या धडकेत ओमनी गाडीचे मोठे नुकसान झाले असून, गाडीतील शोएब खान, त्यांचे वडील मजीमुल्ला खान, आई जिक्रनिसा खान (वय ४५) आणि बहीण सानिया खान (वय १६) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. याप्रकरणी १७ जून रोजी पहाटे १ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रेलर चालक कांतीलाल सासिया मिना (रा. साबळा, राजस्थान; सध्या रा. देवळेफाटा, संगमेश्वर) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.