खेड रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; गोठ्यातील २५ जनावरांचा होरपळून मृत्यू
खेड (प्रतिनिधी):
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला परिसरात गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका पशुपालकाचा गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत गोठ्यातील १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५:१० च्या सुमारास रजवेल मोहल्ला येथील गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागली. गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत आणि चारा साठवलेला असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने जनावरांना बाहेर काढणे कठीण झाले.
घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, चालक गजानन जाधव, जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे आग परिसरातील इतर घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या दुर्घटनेत दोन म्हशींना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र उर्वरित २५ जनावरांना वाचवता आले नाही.
एकाच वेळी २५ जनावरे गमावल्याने पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पशुपालकाचे कंबरडे मोडले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांचा तपास पोलीस व संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
परिसरात या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत असून, नुकसानग्रस्त पशुपालक कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.