मुंबई रेल्वे पोलिसांच्या ‘जीवन रक्षा अभियाना’ला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संकल्पनेचे कौतुक
रत्नागिरी:
मुंबई रेल्वे आयुक्तालय अंतर्गत गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासादरम्यान रूळ ओलांडताना, तसेच घाईघाईत चालत्या गाडीत चढताना किंवा उतरताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. रेल्वे प्रवासातील हे अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त (लोहमार्ग, मुंबई) यांच्या संकल्पनेतून मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात “जीवन रक्षा अभियान” अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
याच अभियानाचा एक भाग म्हणून आज, दिनांक १७ जून २०२६ रोजी, रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे सकाळी ०९:०० ते ११:०० या वेळेत “जीवन रक्षा अभियान” मोठ्या उत्साहात पार पडले. या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी, रूळ ओलांडण्याचे धोके आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, नियोजित रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण आणि माननीय आमदार श्री. निरंजन डावखरे यांनी या उपक्रमाला विशेष भेट दिली. त्यांनी या अभियानात थेट सहभागी होत रेल्वे पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त यांनी आखलेली ही संकल्पना अत्यंत गरजेची आणि कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी या अभियानाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रविण पाडवी, पी.एस.आय. पाटील, महिला पी.एस.आय. लोंढे, महिला पी.एस.आय. धापसे यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) प्रभारी निरीक्षक श्री. सतीश विधाते, रत्नागिरी रेल्वे स्टेशन अधीक्षक श्री. कोवे, कमर्शियल अधिकारी श्रीमती शुभदा देसाई, तसेच रेल्वे पोलीस अंमलदार आणि होमगार्डचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेमुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश गेला असून, रेल्वे पोलिसांच्या या तत्परतेबद्दल प्रवाशांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.