पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाहीच
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कडक इशारा
रत्नागिरी: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली असून रत्नागिरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना आणि विचारधारा बाजूला ठेवणाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान मिळणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीचे चांगले दिवस आले आहेत, असा समज करून घेऊन जर काही कार्यकर्ते पक्ष सोडून तिकडे जाण्याचा विचार करत असतील, तर अशा लोकांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद होतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आपण सर्वजण अनेक संकटांना सामोरे जाऊन उभे राहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी कटिबद्ध राहणे हे आपले कर्तव्य आहे, अशी आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.
येणाऱ्या काळात पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘एसआयआर’ मोहीम आणि प्रत्येक बूथवर ‘बीएलए-२’ ची पारदर्शक पद्धतीने नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावपातळीवरील मतदार आणि सामान्य जनता भाजपच्या विचारांचा कार्यकर्ता आपल्यापर्यंत कधी येतो, याची वाट पाहत असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावातील रस्ते, पाण्याची सक्षम व्यवस्था आणि इतर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित भाजपच्या भव्य पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार तथा प्रभारी योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस व आमदार निरंजन डावखरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रमोद जठार, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय नातू, माजी आमदार व ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात एक काळ असा होता की जिल्हा परिषदेत आपला एकही सदस्य नव्हता आणि आपली ताकद कुठे तरी कमी पडतेय, याची कायम खंत होती. परंतु, आज परिस्थिती बदलली आहे. गुहागर, देवरूख नगरपंचायतीमध्ये आपले नगराध्यक्ष आहेत. कोणत्याही राजकीय फायद्याची अभिलाषा न बाळगता कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार पुढे नेल्यामुळेच हे शक्य झाले आहे. आता भविष्यात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा सदस्य कसा येईल, यासाठी प्रत्येकाने थोडे-थोडे करून पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट केली पाहिजेत. पक्षात अशा ५ कडवट कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे, ज्यांना कोणतीही राजकीय अभिलाषा नसेल आणि जे नात्या-गोत्यांमध्ये अडकणार नाहीत. कोण काय करतो, यापेक्षा भाजपचा विचार पुढे कसा जाईल याचा विचार करणारे असले पाहिजेत, असे चव्हाण यांनी निक्षून सांगितले.
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राष्ट्रभक्तीने प्रेरित आहे. तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची हीच भावना अधिक बिंबवण्याची गरज आहे.
जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाला मोठी गती द्यायची आहे. यासाठी एका विशेष ‘कृती आराखड्याची’ गरज आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनच कोकण समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथील प्राचीन मंदिरांची अनुभूती, त्यांचा दैदिप्यमान इतिहास आणि संस्कृती जगासमोर आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कामाला लागा. जिल्ह्यात रोजगार वाढला तरच कोकणातील तरुणांचे होणारे स्थलांतर थांबवणे हीच आपल्या मनाशी खुनगाठ असली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
सहदेव बेटकरांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश
या मेळाव्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसनेचे सहसंपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी हजार कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी बेटकर म्हणाले, आज मी तुमच्या घरात आलो आता शेवटपर्यंत राहिण. गरिबांसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे. साहेब तुम्ही फक्त डोक्यावर हात ठेवा. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्याची जबाबदारी आमची असेल. काही अडचणी आल्या म्हणून यायाल उशिर झाला.