कोकणनगरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित; उबाठा आक्रमक
रत्नागिरी:
शहरातील कोकणनगर आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या ढिसाळ कारभाराचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेने आज महावितरण कार्यालयावर धडक दिली. समस्या ८ दिवसांत न सुटल्यास उबाठा स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणनगर, स्टेट बँक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, क्रांतीनगर आणि कीर्तीनगर या परिसरात रात्रीच्या वेळी ४ ते ५ तास वीज गायब राहत आहे. कडक उन्हाळा आणि त्यातच रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू असल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण यांचे प्रचंड हाल होत आहेत. महावितरणच्या या कारभारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे.
स्थानिक नगरसेवक केतन शेट्ये आणि फौजीया मुजावर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जाधव यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावर स्पष्टीकरण देताना जाधव यांनी मान्य केले की, या भागात विजेच्या लोडचा प्रश्न असून काही ट्रान्सफॉर्मर (रोहित्रे) नादुरुस्त आहेत.
महावितरण प्रशासनाने ८ दिवसांच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, उबाठा शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, जर दिलेल्या मुदतीत समस्या कायम राहिली, तर महावितरणला तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल. या भेटीवेळी उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.