महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक; रत्नागिरीत ‘स्मार्ट मीटर’वरून संताप
रत्नागिरी:
महावितरणकडून वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याच्या संदेशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आणि संताप निर्माण झाला आहे. या सक्तीच्या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला असून, महावितरणला ‘शिवसेना स्टाईल’ने इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून ग्राहकांना मोबाईलवर मेसेज पाठवून ४८ तासांच्या आत स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याचा दबाव टाकला जात आहे. हा प्रकार लोकशाहीचा अपमान असून, जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी ही कैफियत मांडल्यानंतर ठाकरे सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, “तुम्ही जनतेला ४८ तासांचा दम देता, तर आता तुम्ही ४८ तासांत एक तरी स्मार्ट मीटर बसवून दाखवा; अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.” सक्तीच्या मीटर बसवण्यामुळे होणारी संभाव्य दरवाढ आणि ग्राहकांच्या असहमतीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सौ. सेजल बोराटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
स्मार्ट मीटरबाबत जनतेच्या मनात असलेली भीती आणि सक्तीच्या अंमलबजावणीविरोधात पक्ष रस्त्यावर उतरून जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. महावितरणने जनतेचा विचार न करता अशा प्रकारचे निर्णय लादल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.