कोंकणी समाज ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह अंगणवाडीला भांडी भेट
रत्नागिरी:
कोंकणी समाज ट्रस्ट, एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी माणुसकीचे दर्शन घडवण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा, पावस-गोळप येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व होतकरू ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर स्थानिक अंगणवाडीच्या गरजांकडेही ट्रस्टने लक्ष दिले. पावस-गोळप येथील अंगणवाडी केंद्रास पोषण आहार शिजवण्यासाठी दोन मोठी पातेली आणि एक प्रेशर कुकर भेट देण्यात आला. या साहित्यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहाराची व्यवस्था अधिक सुलभ व दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोंकणी समाज ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमास गोळप ग्रामपंचायत सदस्य व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अविनाश काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन, कोंकणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष सादीक मुकादम, सचिव मोहसीन मापारी, उपाध्यक्ष नासीर शेठ वाघू, खजिनदार हुसेनमियाॅं (बाबू शेठ) मुकादम, जेष्ठ सदस्य छोटू मेस्त्री, इम्तियाज मुकादम, मुबीन मुल्लाजी, रिजवान भाई नदाफ, फैय्याज खतीब आणि पावस विभागाचे मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष महेश शेठ पालकर उपस्थित होते.
भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सुरू राहणार: नासीर वाघू
शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य कोंकणी समाज ट्रस्ट सातत्याने करत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नासीर वाघू यांनी दिली.