पोलिसांच्या गाडीला धडक ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ता. १४ : शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे पोलिसांच्या वाहनाला धडक देणाऱ्या अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास गयाळवाडी फाटा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नवनाथ विक्रम शेंडे (वय ३४, रा. पोलिस मुख्यालय, रत्नागिरी) हे हातखंबाहून येत असताना संशयित टेम्पो चालकाने निष्काळजीपणे टेम्पो चालवून पोलिसांच्या वाहनाला धडक दिली व भरधाव वेगाने चालक पळून गेला. या प्रकरणी नवनाथ शेंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.