आरवली-माखजन मार्गावर भीषण अपघात
बेदरकार चालकाने पादचाऱ्याला उडवले
संगमेश्वर:
आरवली ते माखजन मार्गावर कोडीवरे भुवडवाडी फाटा येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवणाऱ्या चालकाने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, अपघाताची कोणतीही माहिती न देता चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमी पादचारी अमोल बबन मोहिते (वय ३१, रा. कोंडीवरे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हे आरवली ते माखजन जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत जात होते. त्याच वेळी आरवली, भुवडवाडी येथील सुभाष रामचंद्र भुवड (वय ५३) हा आपली वॅगनार कार (क्रमांक MH/08/AX/2826) घेऊन माखजन बाजूकडून येत होता.
कोडीवरे भुवडवाडी फाटा येथील रस्ता चढ-उताराचा आणि ‘एस’ आकाराच्या वळणाचा आहे. मात्र, चालकाने रस्त्याच्या या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि बेदरकारपणे गाडी चालवली. भरधाव कारने समोरील पादचारी अमोल मोहिते यांना जोराची धडक दिली. या धडकेत अमोल मोहिते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात घडवल्यानंतर संबंधित चालकाने जखमीला तातडीने मदत न करता किंवा अपघाताची कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पोबारा केला.
याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिकेत अविनाश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालक सुभाष रामचंद्र भुवड याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ आणि १३४(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.