धामणीत एस टी बसला गव्याची धडक ; प्रवासी सुखरूप
संगमेश्वर : तालुक्यातील धामणी येथे पहाटे ५ च्या सुमारास गव्याने एसटी बसला धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र एस टी चालकाच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
यासंदर्भांत अधिक वृत्त असे की, गुरुवार दि. ११ रोजी पुणे येथून रत्नागिरीकडे प्रवास करणाऱ्या एसटी बसला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धामणी पेट्रोलपंपानजिक एक मोठ्या आकाराचा गवा अचानक रस्त्यावर धावत येवून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचदरम्यान चालक खरात यांच्या नजरेत गवा रेडा आल्याने त्यांनी लगेच गाडीच्या वेगाला आवर घातल्याचे प्रवासी प्रशांत जाधव यांनी सांगितले . सदर अपघातापूर्वी कोयनानगर नजिक गाडीचा डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याची घटना घडली होती त्यात ड्रायव्हर कंडक्टर यांसोबत अन्य प्रवासी ड्रायव्हर यांनी कमालीची मेहनत घेतल्याचे देखील प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे .दरम्यान गवारेड्याची धडक बसल्याने गाडीचा डाव्याबाजूचा हेडलाईट पूर्णतः फुटल्याने गाडीची किरकोळ नुकसान झाले आहे .मात्र चालकाच्या प्रसंगावधनामुळे जिवितहानी टळल्याचे बोलले जात आहे.