शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८५वर्षीय वृद्धेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
एकाच वेळी केले खुबा बदलणे अन् स्टोमा ऑपरेशन
रत्नागिरी: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याची पराकाष्ठा करत एका ८५ वर्षीय वृद्धेवर अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी दुहेरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. परटवणे येथील रहिवासी असलेल्या श्रीम. आनंदी गंगाराम चव्हाण यांच्यावर एकाच वेळी स्टोमा शस्त्रक्रिया आणि हेमीआर्थ्रोप्लास्टी (खुबा बदलणे) करून शासकीय रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वय वर्ष ८५ असलेल्या आनंदी चव्हाण यांना एकाच वेळी दोन गंभीर आजारांचा सामना करावा लागत होता. त्यांचा डावा खुबा फ्रॅक्चर झाला होता, तसेच त्यांना ‘रेक्टल प्रोलॅप्स’ हा त्रासही होता, ज्यावर त्यांची यापूर्वीही एक शस्त्रक्रिया झाली होती. याशिवाय त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील मोठा त्रास होता. या सर्व गंभीर बाबींमुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची व आव्हानात्मक बनली होती.
या गुंतागुंतीच्या आजारांमुळे आनंदी चव्हाण यांनी सुरुवातीला खाजगी रुग्णालयांमध्ये धाव घेतली होती, मात्र शस्त्रक्रियेमधील अतीव जोखीम पाहता खाजगी डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवली होती. अखेर अत्यंत हताश झालेल्या अवस्थेत रुग्ण १२ मे रोजी रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्या. रुग्णाची वाढलेली जोखीम पाहता ही शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टरांच्या कौशल्याची मोठी परीक्षाच होती. अशा शस्त्रक्रियेमध्ये सामान्यतः रुग्णाला पूर्ण भूल देणे आवश्यक असते, परंतु चव्हाण यांची हृदयाची स्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना पूर्ण भूल देणे शक्य नव्हते. त्यामुळे भूलतज्ज्ञांनी अत्यंत काळजीपूर्वक केवळ कमरेखालील भागापुरतीच मर्यादित भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
शासकीय रुग्णालयातील काही आठवड्यांच्या पूर्व-उपचारानंतर, १९ मे रोजी ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शल्यचिकित्सकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निखिल देवकर, भूलतज्ज्ञ डॉ. जामशेर आणि डॉ. प्रियांका यांच्या तज्ज्ञ पथकाने अविरत कष्ट घेऊन ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केली. या मोहिमेत रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया गृह कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर चव्हाण यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे उत्तम आहे.
तब्बल महिनाभराच्या यशस्वी उपचारानंतर १० जून रोजी त्यांना रुग्णालयातून आनंदाने डिस्चार्ज देण्यात आला. खाजगी रुग्णालयांनी नाकारलेली ही गुंतागुंतीची केस यशस्वी करून दाखवल्यामुळे रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.