डंपर अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल
खेड: डंपरमधून ग्रीट पावडर खाली करत असताना वाहन मागे घेताना झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० जून रोजी खेड तालुक्यातील सुकीवली येथील कॉरी (खाण) परिसरात घडली. नितीन विजय पवार (वय २२) असे या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नितीन पवार हा डंपर (क्रमांक एम.एच. ०८ डब्ल्यु ८४१७) घेऊन वेरळ येथील क्रेशरवरून ग्रीट पावडर भरून सुकीवली येथील खाणीत आला होता. १० जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो खाणीमध्ये डंपरमधील माल खाली करत होता. यावेळी वाहन मागे घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन मागे जाऊन थेट खाणीत पलटी झाले.
या भीषण अपघातात डंपर चालक नितीन पवार हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी सुनील सखाराम पवार (वय ३९, रा. चिंचघर दस्तुरी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मृत नितीन पवार याने वाहन चालवताना निष्काळजीपणा आणि हयगय केल्याचा ठपका ठेवत, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.