‘त्या’ पुलाच्या कामाला मंजुरीबाबत साशंकता
अपघाताची जिल्हा परिषद प्रशासनामार्फत होणार चौकशी
रत्नागिरी : तालुक्यातील कुर्धे येथे बांधकाम सुरु असताना पुलाचा एक भाग कोसळून सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच या छोट्या पुलाच्या कामाला मंजुरी नसल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर जि.प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे व उपाध्यक्ष विलास चाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाळ्यात ग्रामस्थांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करुन देण्याचे पदाधिकाऱ्यांनी मान्य केले.
कुर्धे येथे लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान असणाऱ्या छोट्या नदीवरील साकव नादुरुस्त झाल्याने या ठिकाणी वाहने जातील अशा पद्धतीने छोट्या पुलाची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार साकव विकास कार्यक्रमांतर्गत पुलाचे काम करण्याचेही ठरवण्यात आले होते. यासाठी सुमारे ५५ लाखांचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. परंतु या कामाची निविदा प्रक्रिया झाली नव्हती अशी माहिती आता चर्चिली जात आहे.
या पुलावर काँक्रीटचे काम बाकी होते. मात्र मंगळवारी पुलाच्या क्रॉक्रीटचा भाग कोसळून सुपरवायझर अक्षय काटे याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली. हा ब्रीज अर्धवट राहणार असल्यामुळे ग्रामस्थांचे पावसाळ्यात वाहतुकीचे हाल होणार आहेत. विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात येण्याजाण्यापूरती तात्पुरती सुरक्षित व्यवस्था करुन देण्याच्या सूचना जि.प. बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेची चौकशीही प्रशासनामार्फत केली जाणार आहे.