नाचणे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वाचार लाखांचे दागिने लंपास
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील नाचणे येथील आसमंत सावंतनगर भागात एक धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी हेमंतकुमार महेंद्र चोप्रा (वय ५३, व्यवसाय-वकील) हे ९ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ४:०० च्या दरम्यान घराबाहेर गेले होते. याच कालावधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडीसहित उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी आणि लाकडी कपाटांमधून फिर्यादींच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले. यासोबतच याच परिसरात राहणारे विराज विश्वनाथ तोडणकर आणि आरती स्वप्नील पवार यांच्या फ्लॅटमधूनही सोन्याचे दागिने चोरण्यात आले.
चोरीला गेलेल्या मालामध्ये ८० हजार रुपयांचा सोन्याचा हार, ४० हजारांच्या बांगड्या, २० हजारांची सोन्याची चैन, सोन्याच्या वेगवेगळ्या अंगठ्या, सोन्याचे सलेट, मोत्यांच्या माळा आणि चांदीची भांडी (ताम्हान, पळी, तांब्या) यांचा समावेश आहे. याशिवाय बुद्धिबळाच्या सोंगट्या आणि गणपतीचे पेंडंट असे एकूण ४ लाख १६ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.