झाडाखाली झोपलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा कारखाली चिरडून मृत्यू
दापोली:
दापोलीतील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवरील ‘लेमन ट्री’ हॉटेलच्या आवारात एका तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडी रिव्हर्स घेताना चालकाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी गणपती प्रेमु राठोड यांची ३ वर्षे ८ दिवसांची मुलगी सान्वी ही हॉटेलच्या आवारातील वडाच्या झाडाखाली शांतपणे झोपली होती. दरम्यान, आरोपी चालक बापू हिरामण पवार (रा. सुतारकोड, दापोली) याने आपली क्रेटा कार (एम.एच. ०८ ए.एक्स. ५८८७) मागे घेताना (रिव्हर्स घेताना) आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही. गाडी रिव्हर्स घेत असताना ती थेट सान्वीच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
आपल्या चिमुकल्या मुलीचा अशा प्रकारे झालेला मृत्यू पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणी फिर्यादी गणपती राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, दापोली पोलीस ठाण्यात आरोपी चालक बापू हिरामण पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ जून रोजी रात्री ९.१३ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.