साप चावल्याने ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
आडीवरे परिसरात हळहळ
रत्नागिरी:
राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा साप चावल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जयवंत विश्वनाथ नार्वेकर (वय ७०, रा. कोंबे, आडीवरे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सकाळी जयवंत नार्वेकर हे आपल्या घराच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाची साफसफाई करत होते. यावेळी अचानक त्यांना डाव्या पायाच्या पंजाला सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (अमं. क्र. १५/२०२६) करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.