नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक 2 आठवड्यात हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा:जिल्हाधिकारी मनुज जिंदल
उत्पादित होणाऱ्या रसायनांची कारखानदारांकडून घ्यावी
:पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी, : ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हद्दपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत, पुढील 2 आठवड्यात ती निकाली काढावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसी मध्ये ज्या कारखान्यांमध्ये रसायनांचे उत्पादन होते, त्यांच्या नावांची यादी फॅक्टरी निरीक्षकांनी घ्यावी. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसाठी रसायने ओळखण्यासाठीची कार्यशाळा घ्यावी, अशी सूचना पोलीस नितीन बगाटे यांनी दिली.
नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ते म्हणाले, सर्व विभागांनी कर्तव्य तसेच जबाबदारी म्हणून सक्रीय कार्यवाही करावी. एमडी बनवायला जे रसायनिक पदार्थ लागतात, ते आपल्या येथील एमआयडीसीतील कारखान्यात बनतात का, त्याबाबतची यादी तसेच वाहतूक होणाऱ्या रसायनाची माहिती द्यावी.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, चिपळूण हे मोठे शहर आहे. त्या परिसरात पर्यटकांची गर्दी असते. अशा ठिकाणी सतर्क राहून सर्वच अधिकाऱ्यांनी विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती केंद्र सुरु करावे. प्रलंबित हद्दपाराची प्रकरणे पुढील 2 आठवड्यात निकालात काढावीत. अंमली पदार्थ विरोधात प्रत्येक विभागाने कार्यवाहीत योगदान द्यावे.
