प्रौढाला फावड्याने मारहाण; ४ जणांवर गुन्हा दाखल
संगमेश्वरः तालुक्यातील कोंड्ये बौद्धवाडी येथील रस्त्यावरील मोरी टाकण्याचे काम बंद पाडण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत फावड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोंड्ये बौद्धवाडी येथील रस्त्यावर मोरी टाकण्याचे काम सुरू होते. हे काम बंद करण्यासाठी फिर्यादी दिलीप गणपत मोहिते (५५, रा. कोंड्ये बौद्धवाडी) हे गेले होते. त्यावेळी गावातील संशयित आरोपी महेश प्रभाकर देसाई आणि उल्हास पांडुरंग देसाई यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढला. नागेश उल्हास देसाई व उल्हास देसाई याने तेथील फावड्याने दिलीप मोहिते यांना मारहाण केली. तसेच संशयित आरोपी सागर सुरेश देसाई, नागेश देसाई यांनी फिर्यादी यांना हाताच्या थापटाने मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेले दिलीप मोहिते यांच्यावर सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी महेश देसाई, उल्हास देसाई, सागर देसाई, नागेश देसाई (सर्व रा. कोंड्ये, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या चौघा संशयित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.