अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचे मनूज जिंदल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
रत्नागिरी:-
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज अनिकेत तटकरे यांना विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कारही करण्यात आला.
अनिकेत तटकरे यांना प्रमाणपत्र देण्याच्या या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, अॅड. बंटी वणजू
या सर्व नेत्यांनी आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी अनिकेत तटकरे यांचे अभिनंदन करत जोरदार जल्लोष केला. तटकरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या मतदारसंघातील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, ऐनवेळी इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा विधानपरिषदेचा मार्ग सुकर झाला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाला गती देण्यासाठी तटकरे यांच्या या निवडीमुळे मोठी ताकद मिळणार असल्याची चर्चा आहे.
अनिकेत तटकरे यांच्याकडे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते. यापूर्वीही त्यांनी विधानपरिषदेत कोकणातील विविध प्रश्नांवर, विशेषतः पर्यटन, पायाभूत सुविधा आणि मच्छिमारांच्या समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे. आता पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध निवड झाल्याने तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणाला आणि रखडलेल्या विकासकामांना मोठी गती मिळेल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
”हा कोकणच्या जनतेचा आणि महायुतीच्या एकजुटीचा विजय आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन.”
— अनिकेत तटकरे, नवनिर्वाचित आमदार, विधानपरिषद