चिपळूणमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
चिपळूण:-
मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांधीचौक येथील ‘स्वामी जनरल पान शॉप’ या दुकानावर छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले असून, याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील गांधीचौक पानगल्ली येथे असलेल्या ‘स्वामी जनरल पान शॉप’ या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धडक दिली. या दुकानाचे मालक प्रवीण सदानंद बांदेकर (वय ५३, रा. कापसाळ) हे शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ विकत असल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या १६ जुलै २०२५ च्या आदेशानुसार, हे पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, त्याचे सेवन केल्यास गंभीर आजार होऊ शकतात, याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपीने हे पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री अण्णासाहेब परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, चिपळूण पोलिसांनी आरोपी प्रवीण बांदेकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, हे प्रतिबंधित पदार्थ नेमके कोठून आणि कोणाकडून खरेदी केले, याचा कोणताही तपशील आरोपीने सादर केला नाही. तसेच, प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक करून त्याने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केले आहे. हे पदार्थ केवळ आरोग्यास अपायकारक नाहीत, तर ते सेवन करणाऱ्यांच्या जनुकीय संरचनेतही बदल घडवू शकतात, इतके ते घातक असल्याचे तपासात समोर आले आहे.