पत्नीला सासरी नेण्यास विरोध; तरुणाला बेदम मारहाण
चिपळूण:
पत्नीला सासरी नेण्यासाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणावर ७ जणांच्या टोळक्याने लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याच्या कारची तोडफोड करत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना ४ जून रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास चिपळूण येथील गोवळकोट रोडवरील अस्मिना प्लाझा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फैजान सिकंदर चौगुले (वय २५, रा. खेर्डी) हे आपली पत्नी सानिया हिला घेऊन घरी जाण्यासाठी सासरी गेले होते. यावेळी तेथील आरोपींनी त्यांना पत्नीला नेण्यास विरोध केला. याच कारणावरून आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी फैजान यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली.
फैजान यांनी विचारणा केली असता, आरोपींनी “तू आमची मुलगी पळवून नेली आहेस, त्याची ही शिक्षा भोगत आहेस” असे म्हणत लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर जोरदार प्रहार केले. यावेळी फैजान यांच्या मालकीच्या मारुती सियाज (MH ०८-Z ९७८७) कारवर दगड आणि बांबूने हल्ला करत गाडीच्या सर्व काचा फोडून नुकसान केले. जाताना आरोपींनी फैजान यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेप्रकरणी फैजान चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अब्दुल शेख, शाहीद शेख, बाबु शेख, खालीद शेख, असलम शेख, फारुख बाबासाहेब शेख आणि आमान शेख (सर्व रा. गोवळकोट रोड, चिपळूण) या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ११८(१), ३५२ आणि ३५१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.