रत्नागिरीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकारांतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम दामले हायस्कूलमध्ये आणि त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे वृक्षारोपण करण्यात आले.
वातावरण बदलामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम रोखायचे असतील तर वृक्षारोपणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. या वेळी चिकू, पेरू, जाम, आवळा, कदंब आणि मोहगनी यांसारख्या विविध प्रकारच्या उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दामले विद्यालयात मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक भगवान मोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे, कस्तुरी पराडकर, शितल मजगावकर, सुप्रिया पानकर, श्वेता महाडिक तसेच शिक्षक रवींद्र शिंदे, प्रकाश मांडवकर, अनिल शेटे आणि योगेश कदम उपस्थित होते. विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासकीय विश्रामगृह येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजु, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आनंद तापेकर, डिजिटल पत्रकार परिषद जिल्हा अध्यक्ष मुश्ताक खान, कार्याध्यक्ष राजेश शेळके, मनोज लेले, राकेश गुडेकर, जमीर खलफे, भालचंद्र नाचणकर, शोभना कांबळे, तन्मय दाते, शकील गवाणकर, कांचन मालगुंडकर, रहीम दलाल, राजन चव्हाण आणि सचिन बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. रत्नागिरीतील पत्रकार क्षेत्रातून राबवल्या गेलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

