भगवतीनगर-निवेंडी येथे विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथील विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार 3 जून रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास घडली.
स्वरा स्वप्नेश जाधव (3,रा.नागाव विशाल कंम्पाउंड चाळ दहिसर,ठाणे ) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिची आई श्वेता जाधव हिने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली त्यानुसार, श्वेता जाधव आपली मुलगी स्वरा आणि इतर मित्र मैत्रीणीं सोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी भगवतीनगर निवेंडी येथे आली होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी तिची मुलगी स्वरा ही राहत असलेल्या ठिकाणाच्या परिसरात इतर मुलांसोबत खेळत होती.
परंतू काहीवेळाने स्वरा इतर मुलांसोबत दिसून न आल्याने श्वेता जाधव हिने आजुबाजुला शोध घेत बाजूच्याच विहिरीत डोकाउन पाहिले असता तिला स्वरा ही विहिरीच्या पाण्यावत उपड्या स्थितीत तरंगताना दिसून आली. म्हणून राहुल कैलास पाटील व इतर लोकांनी तिला दोरीच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर काढले. तेव्हा स्वरा शुध्दीत असल्याने त्यांनी तिला सीपीआर देउन उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.