रत्नागिरीत मध्यरात्री कारला भीषण आग; शेजारी उभी असलेली दुचाकीही जळून खाक
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:
शहरातील प्रशांत नगर, स्वरूपानंद नगर परिसरात आज मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण आगीची घटना घडली. येथील रहिवासी श्री. सुरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेल्या मारुती सुझुकी ‘एसएक्स ४’ कारला अचानक भीषण आग लागली. मध्यरात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. सुरज जाधव यांच्या मालकीची मारुती सुझुकी कार (क्र. MH 46 N 7377) ही नेहमीप्रमाणे बंगल्याच्या आवारात उभी होती. रात्री दोनच्या सुमारास गाडीतून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाला निघू लागल्या. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कारला कवेत घेतले. ही आग इतकी भीषण होती की, कारच्या शेजारीच उभी असलेली टीव्हीएस रायडर (TVS Raider) मोटरसायकल (क्र. MH 08 BA 5583) देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत कारसह दुचाकीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. अग्निशमन दल, रत्नागिरीच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मध्यरात्रीची वेळ असतानाही अग्निशमन दलाच्या पथकाने कमालीची तत्परता दाखवली. उप-अग्निशमन अधिकारी विवेक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अग्निशमन विमोचक आनंद राऊत आणि दिलीप दळवी, तसेच चालक यंत्र चालक राकेश बाबर यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
या मोहिमेत अग्निशमन विमोचक किशोर, महेश मुरडी, ओम यादव, शुभम गायकवाड आणि देवराज बंडगर या जवानांनी जीवाची बाजी लावून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. बंगल्याच्या आवारात आग लागल्याने ती मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी कौशल्याने आणि वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अधिकृतपणे समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वेळेवर धावून येत आग विझवल्याबद्दल जाधव कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले आहेत.