लांजा बेनी बुद्रुक येथे बिबट्याचा घरात घुसून दोघांवर प्राणघातक हल्ला
लांजा:-
लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडी परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने थेट घरात घुसून एका ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी शेजाऱ्याला वाचवण्यासाठी गेलेला १९ वर्षीय मुलगाही बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीत राहणारे संतोष सुर्वे आपल्या घरात असताना, घराच्या पाठीमागच्या बाजूने आलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्या थेट घरात घुसल्याने परिसरात खळबळ उडाली.
बिबट्याने संतोष सुर्वे यांच्यावर हल्ला केल्यानंतर, त्यांना वाचवण्यासाठी शेजारील १९ वर्षीय मुलगा धावून गेला. यावेळी बिबट्याने त्याच्यावरही हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. आरडाओरडा ऐकून परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. ग्रामस्थांच्या आवाजामुळे बिबट्याने तेथून पळ काढला, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
या हल्ल्यात जखमी झालेल्या बाप-लेकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. लांजा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, थेट मानवी वस्तीत आणि घरात घुसून हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.