कार चालकाची डुलकी बेतली जीवावर
अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत चालकावर गुन्हा
संगमेश्वर:
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे निवे बुद्रुक (सरोदेवाडी) येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चालकास डुलकी लागल्याने वॅगनार कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रशेखर शिवराम पांचाळ (वय ५३, रा. सायले, ता. संगमेश्वर) हे आपली वॅगनार कार (क्रमांक एम.एच.०२-जेपी-९४९३) घेऊन १ जून २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास सायले येथून निघाले होते. त्यांच्यासोबत कारमध्ये मंगेश महादेव पाताडे, नंदिनी मंगेश पाताडे आणि विनय केशव संकपाल हे प्रवासी होते. ते देवरुख-रत्नागिरी मार्गाने जात असताना, सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास निवे बुद्रुक, सरोदेवाडी येथे चालकाला डुलकी लागल्याने कारचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरवर (क्रमांक एम.एच.०८-जी-१५५९) जाऊन आदळली.
या भीषण धडकेत कारमधील विनय केशव संकपाल (वय ३४, रा. मालाड, मुंबई) हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. तर, कार चालक चंद्रशेखर पांचाळ, तसेच कारमधील मंगेश महादेव पाताडे (वय ४६) आणि नंदिनी मंगेश पाताडे (वय ४२, दोन्ही रा. वांद्री) हे जखमी झाले आहेत. अपघातात नंदिनी पाताडे यांचा उजवा हात फॅक्चर झाला असून, इतर दोघांनाही मार लागला आहे.
याप्रकरणी डंपर मालक प्रशांत सुरेश रसाळ (वय ४४, रा. निवे बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी चालक चंद्रशेखर पांचाळ याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.