डंपर-रिक्षाच्या धडकेतील मृताची ओळख पटली
भरणे-खेड मार्गावर अपघात; मृत नांदिवलीतील
खेड: तालुक्यातील भरणे – खेड मार्गावर ता. ३० रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. नांदीवली येथील नवीन गंगाराम कदम असे त्यांचे नाव आहे. दरम्यान गंभीर जखमी रिक्षाचालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भिलारे आयनी येथील संतोष भिलारे हा रिक्षा घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते. आठवडा बाजार परिसर येथे पाठीमागून आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले, तर पादचारी नवीन गंगाराम कदम (वय ४२, रा. नांदीवली केळेवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. नवीन कदम हे व्यवसायाने शिंपी होते. परंतु भूगर्भातील पाणी दाखवण्याचे त्यांच्यात कौशल्य असल्याने संपूर्ण कोकणातून विविध ठिकाणावरून त्यांना ग्रामस्थ विहीर किंवा कूपनलिका खोदण्यापूर्वी बोलवत असत. त्यामुळे अनेकांशी त्यांचा परिचय होता.