निवे बुद्रुक येथे भीषण अपघात; नमन कलाकाराचा मृत्यू, ४ जण गंभीर
देवरुख:
देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे सोमवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सायले येथील नमन कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या वॅगनआर कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना घडली.
सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नमन कलाकार आपली वॅगनआर कार (एमएच ०२ जेपी ९४९३) घेऊन निवळीच्या दिशेने जात होते. निवे बुद्रुक परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (एमएच ०८ जी १५५९) या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात विनायक सपकाळ (वय ३०, रा. सावर्डे, चिपळूण) हे मयत झाले असून ते नमन कलाकार होते. याशिवाय कारचालक चंद्रशेखर पांचाळ (वय ५३) यांच्यासह मंगेश पाताडे (वय ४५) आणि नंदिनी पाताडे (वय ४०, दोघेही रा. वांद्री, संगमेश्वर) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर आणि संतोष सांडिम यांनी तातडीने धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, ‘भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका’ सेवेचे चालक मनोज पांचाळ यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामस्थांच्या या मदतीमुळे जखमींना वेळेत उपचार मिळू शकले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. कारचालकाचा ताबा सुटला होता की अन्य तांत्रिक बिघाड, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे नमन कलाकारांच्या वर्तुळात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.