अंजनवेल येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गुहागर: तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी परिसरात एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओंकार विजय सैतवडेकरे (वय २७) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ओंकार सैतवडेकरे हा आपल्या राहत्या घरी होता. यादरम्यान, त्याने घरातील किचनच्या छताच्या हुकाला (भाला) नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पाहणी केली असता, ओंकारचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ओंकारने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्रमांक १९/२०२६) करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. अवघ्या २७ वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपवल्याने अंजनवेल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.