५ लाखांचा गुटखा जप्त, पण ‘मुख्य सूत्रधार’ मोकाट
पोलिसांच्या तपासावर नागरिकांचा प्रश्नचिन्ह
देवरुख: संगमेश्वर पोलिसांच्या पथकाने तीन दिवसांपूर्वी ५ लाख ४६ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि कार जप्त करून मोठी कारवाई केली होती. मात्र, या घटनेला तीन दिवस उलटूनही संशयित आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत. आरोपी फरार असल्याने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? हा गुटखा नेमका कुठून आणला होता आणि कुठे वितरित होणार होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पारेख पेट्रोल पंपासमोर एक संशयित कार (एमएच १४ बीके ४१२०) उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, कार लॉक अवस्थेत आढळली. तपासणी केली असता, त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उपस्थितीत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संगमेश्वर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, चालक वाहन सोडून पसार झाल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक होत असतानाही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “अनेकदा अशा कारवाईत फक्त माल जप्त होतो आणि मुख्य आरोपी मोकाट सुटतात,” अशी भावना स्थानिकांमध्ये आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुटखा तस्करीच्या या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कसून प्रयत्न करत असून, लवकरच काही नवे धागेदोरे समोर येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.