अहिल्याबाई होळकरांची जयंती घराघरांत साजरी करा : अमृत गोरे
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य जातीपातीच्या पलीकडचे होते. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी भारतात शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या, म्हणूनच आज आपले देव सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी म्हणून अहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरांत साजरी करावी, असे आवाहन ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र कोकण युवक उपप्रदेश अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमृत अंकुश गोरे यांनी केले आहे.
ते म्हणाले की, “अहिल्याबाई होळकर या योग्य न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले तसेच प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धारही केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्याबाईंना प्रजेसाठी कल्याणकारी कामे करण्याची आवड होती. आताच्या राजकारण्यांनी त्यांचा थोडातरी अभ्यास करून त्यांचे हे गुण अंगी बाणले पाहिजेत. प्रजेसाठी झटणाऱ्या अशा नेतृत्वाची दखल घेऊन त्यांच्या कार्याला मानवंदना म्हणून अहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरांत साजरी करायला हवी.”
