झाडगाव एमआयडीसीतील 26 बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा
रत्नागिरी :
शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर पक्की बांधकामे व टपर्यांवर शुक्रवारी एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली. यावेळी 26 बेकायदेशीर पक्की बांधकामे, टपर्या जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आला. चिपळूण खेर्डीनंतर रत्नागिरीत ही मोठी कारवाई करण्यात आली. मिरजोळे एमआयडीसीतील बेकायदा बांधकामांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे.
रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव एमआयडीसीअंतर्गत बेकायदा उभारण्यात आलेला बांधकामांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. यासंदर्भात न्यायालयातही एमआयडीसीने धाव घेतली होती. त्यानंतर 28 मे रोजी बांधकाम पाडण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र 28 रोजी बकरी ईद असल्याने एमआयडीसीने ही कारवाई पुढे ढकळली होती.
शुक्रवारी एमआयडीसीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलीस यंत्रणा दोन जेसीबी, ट्रॅक्टर साहित्य घेऊन या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी पोहचले व सकाळपासून ही बांधकाम हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यात पक्की बांधकामे व टपर्यांचा समावेश होता.
शुक्रवारी कारवाई होणार याचे संकेत असतानाही एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांची उदासिनता दिसून आली. काही अधिकार्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई रद्द झाल्याचे फोनही एक कर्मचार्याने फिरवले. अगदी सुरक्षा रक्षकांनाही अधिकार्यांचा निरोप पोहचवण्यात आला. परंतु एमआयडीसीच्या मुंबईतील अधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरु असताना कोणीही आडकाठी केली नाही.
या ठिकाणी काही रहिवासी वास्तव्यास असून, त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पावसाळा संपेपर्यंत मुदत मागितली होती. त्यानुसार या रहिवाशांना पावसाळा संपेपर्यत त्याठिकाणी वास्तव्य करण्याची मुभा एमआयडीसीने दिली आहे. त्यामुळे या रहिवासी घरांवरील कारवाई पावसापर्यत टळली आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याठिकाणी झोपड्यांमध्ये राहणार्या लोकांना झोपडपट्टी निर्मूलन योजनेअंतर्गत नोंदणी करुन त्यांना पक्की घरे देण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. स्वत:च्या घरात या लोकांना राहता यावे यासाठी उद्योगमंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले आहे.
