बोटीवर काम करणाऱ्या कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः बोटीवर काम करत असताना अशक्तपणा व अंग गरम झालेल्या कामगाराला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भगवान रामचंद्र ऐरणकर (वय ४७, रा. मुळ खारवीवाडा पेण, जि. रायगड. सध्या मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.२८) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भगवान ऐरणकर हा बोटीवर काम करत असताना त्याला अचानक अशक्तपणा आला व त्याचे अंग गरम झाले. तेथील सहकाऱ्यांनी त्याला केबीन मध्ये बसविले. पण त्याचे अंग जास्तच गरम जाणवले म्हणून त्याला खासगी गाडीतून बुधवारी (ता. २७) उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.