बाळू वाले मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय
मित्रांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
खेड: खेड शहरातील खेडजाई मंदिराजवळील शशिकांत राजाराम दांडेकर यांच्या शेतात उपड्या अवस्थेत सापडलेल्या बाळू विठ्ठल वाले (वय ३२) यांच्या मृत्यू प्रकरणात आता दिवसागणिक नवे खुलासे समोर येत असून, हा मृत्यू घातपात असू शकतो असा संशय त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केला आहे. या प्रकरणातील प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
याप्रकरणी २० मे रोजी खंडू विठ्ठल वाले यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ बाळू वाले हा खेड येथे एका सिक्युरिटी ऑफिसमध्ये काम करत होता. काही दिवसांपासून तो कामावर येत नसल्याचा फोन आल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र बाळू याला अधूनमधून कुठेतरी निघून जाण्याची सवय असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला आठ दिवस वाट पाहिली. त्यानंतर खेड पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची खबर देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना खेडजाई मंदिराजवळील शेतात एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली.
यानंतर खंडू वाले यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, अंगावरील कपडे आणि डोक्यावरील टक्कल पाहून तो मृतदेह बाळू वाले यांचाच असल्याची खात्री झाल्याचे खेड पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवार दि. २२ मे रोजी बाळू वाले यांचे मित्र धनाजी साळुंखे यांनी दैनिक प्रहारशी संपर्क साधत या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाळू वाले हे बेपत्ता होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी खेड शहरातील काही तरुणांसोबत त्यांचा वाद झाला होता. या वादादरम्यान बाळू यांनी संबंधितांपैकी एकाला दोन ते तीन कानफाडीत मारल्याचेही त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले होते. त्यामुळे या वादाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या वादानंतर बाळू वाले यांनी आपल्या रूमवर जाणे देखील टाळले होते. पुढील दोन ते तीन दिवस ते रूमवर न जाता बाहेरच राहत होते, अशी माहिती बाळू वाले यांचे मित्र धनाजी साळुंखे यांनी दिली.
त्यामुळे बाळू कोणाच्या भीतीखाली होते का?, अथवा त्यांच्यावर कोणता दबाव होता का?, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. धनाजी साळुंखे यांनी बोलताना बाळू वाले यांना दारूचे व्यसन असल्याची माहितीही दिली. पगार झाल्यानंतर काही दिवस ते दारू पिण्यासाठी गायब होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावेळी काही बाबी संशय निर्माण करणाऱ्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. १२ मे रोजी पगार न झाल्यामुळे बाळू वाले यांनी aapkya सांगली येथील मित्रांकडून ५०० रुपये उसने मागितले होते. त्यांचा मित्र निखिल गणेश गोरे याने ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवली होती. त्यानंतर बाळू यांनी त्या पैशांपैकी २०० रुपये लक्ष्मीकांत गुरुनाथ भुते यांना यूपीआयद्वारे पाठवले होते. त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर सुमारे २० हजार रुपये पगार जमा झाल्याचेही मित्रांनी सांगितले. मात्र विशेष बाब म्हणजे, १२ मे नंतर त्यांच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नसल्याचे मित्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खात्यात पगाराची मोठी रक्कम असताना बाळू अचानक बेपत्ता कसा झाला?, हा प्रश्न आता मित्रपरिवाराकडून उपस्थित केला जात आहे. बाळू वाले हे खेड शहरातील जप्त करण्यात आलेल्या एका प्रॉपर्टीवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असल्याची माहिती धनाजी साळुंखे यांनी दिली. हे ठिकाण खेड बस स्थानकाजवळ असल्याचे बाळू वाले यांनी त्यांच्या मित्रांनी सांगितले hote. ते अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच खेड येथे कामासाठी आले होते.
याच काळात खेडमधील एका ‘ताई’ने त्यांना मोठी मदत केल्याचे देखील ते मित्रांना सांगत होते. त्यामुळे ही ‘ताई’ नेमकी कोण, याचाही शोध घेण्याची मागणी आता होत आहे. मित्रांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या परिसरात दारूची बाटली, पाण्याची बाटली किंवा खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत. त्यामुळे बाळू त्या ठिकाणी स्वतः गेला होता की त्यांला तेथे आणण्यात आले होते, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनास्थळावरील फोटोंवरून मृतदेह ‘कुजला होता की जाळला होता?’ असाही गंभीर प्रश्न धनाजी साळुंखे यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी ते रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सखोल चौकशीची मागणी करणारा अर्ज करणार असल्याचे देखील दै प्रहार शी बोलताना सांगितले. बाळू वाले यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय?, वाद झालेली ती तरुण मंडळी कोण?, मदत करणारी ‘ती ताई’ कोण? आणि या प्रकरणामागे आणखी कोणते धागेदोरे आहेत का?, याचा उलगडा होणे गरजेचे असल्याचे मत मित्रपरिवाराने व्यक्त केले आहे.