किरकोळ कारणातून वृद्धाला मारहाण
खेड सापिर्ली भराडवाडी येथील घटना
खेड (प्रतिनिधी):
तालुक्यातील सापिर्ली भराडवाडी येथे आंबे काढण्याचा झेला आणल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने एका वृद्धाला बांबूच्या काठीने व हाताने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत ६५ वर्षीय वृद्ध जखमी झाले असून, मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या वृद्ध आईलाही आरोपीने धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सापिर्ली येथे राहणारे भरत कृष्णाजी पालांडे (वय ६५) यांनी त्यांचे शेजारी सतिष पालांडे यांच्या मालकीचा आंबे काढण्याचा ‘झेला’ आणला होता. हा झेला त्यांनी आरोपीला न विचारता, आरोपीच्या वडिलांना विचारून आणला होता. परंतु, “मला न विचारता माझा झेला का आणला?” याचा तीव्र राग मनात धरून आरोपी सतिष श्रीकांत पालांडे याने २० मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भरत पालांडे यांना गाठले.
आरोपीने भरत पालांडे यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की, आरोपीने बांबूच्या काठीने भरत यांच्या पाठीवर जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने भरत पालांडे यांचा हाताने गळा दाबून, नखांनी त्यांच्या चेहऱ्यावर ओरबाडले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भरत पालांडे यांच्या वृद्ध आईलाही आरोपीने बेदम धक्काबुक्की केली.
या मारहाणीत भरत कृष्णाजी पालांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी गुरुवारी खेड पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. फिर्यादी भरत पालांडे यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी २१ मे रोजी दुपारी ३:१७ वाजता आरोपी सतिष श्रीकांत पालांडे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.