गुगलवर ट्रॅव्हल कंपनीचा नंबर शोधणे पडले महागात
मुंबईतील व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक
रत्नागिरी (प्रतिनिधी):
गुगलवर ट्रॅव्हल कंपनीचा नंबर शोधणे मुंबईतील एका नोकरदार व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अवघ्या १४९ रुपयांचे रजिस्ट्रेशन शुल्क भरण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल २ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा डल्ला मारला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण अंतर्गत पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विवेक मनमोहन सोन्स (वय ५५ वर्षे, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई) हे नोकरीनिमित्त रत्नागिरीत आले होते. त्यांना झाडगाव येथील फिनोलेक्स गेस्ट हाऊस ते गोळप येथील फिनोलेक्स कंपनीत ये-जा करण्यासाठी एका खाजगी गाडीची आवश्यकता होती.
गाडी भाड्याने घेण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले असता, त्यांना ‘ट्रॅव्हलर अँड सेल्फ ड्राईव्ह लक्ष्मी रत्नागिरी’ नावाचा एक मोबाईल नंबर मिळाला. सोन्स यांनी त्या नंबरवर संपर्क साधला असता, समोरून अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवली आणि गाडी बुक करण्यासाठी १४९ रुपये रजिस्ट्रेशन फी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे भरण्यास सांगितले.
विवेक सोन्स यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या क्रेडिट कार्डचा १६ अंकी नंबर आणि ३ अंकी सीव्हीव्ही नंबर टाकला व १४९ रुपये भरण्याचा पर्याय निवडला. मात्र, १३ मे २०२६ रोजी दुपारी १:३५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ‘ॲपल इंडिया’ या कंपनीच्या नावाने २,५१,८०० रुपयांच्या ट्रान्झॅक्शनचा ओटीपी आला.
इतकी मोठी रक्कम डेबिट होत असल्याचे पाहून सोन्स यांनी तो ओटीपी न भरता व्यवहार रद्द केला आणि लिंक बंद केली. मात्र, काही सेकंदातच त्यांना एक ऑटोमेटेड कॉल आला. त्यात “हा व्यवहार तुमचा असल्यास १ दाबा आणि आक्षेप असल्यास ९ दाबा” असे सांगण्यात आले. सोन्स यांनी फसवणूक टाळण्यासाठी ‘९’ हा अंक दाबला.
पण, ‘९’ अंक दाबताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून २ लाख ५१ हजार ८०० रुपये ॲपल इंडियाच्या खात्यावर वळवले. बँकेच्या मेसेजवरून ही फसवणूक झाल्याचे सोन्स यांच्या लक्षात आले.
या सायबर फसवणुकीबाबत विवेक सोन्स यांनी दिलेल्या तक्रारीवरून २१ मे २०२६ रोजी रात्री ९:१३ वाजता रत्नागिरीत अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (१) (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.