महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ
रत्नागिरीत पेट्रोल 110.44 तर डिझेल 96.96 रुपये
रत्नागिरी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वप्रथम 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच 20 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत आता पेट्रोल 110.44 तर डिझेल 96.96 रुपये झाले आहे.