जिल्ह्यात हॉटेल चालकांना लुटणारी टोळी सक्रिय
दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या हॉटेल आणि लॉज चालकांना टार्गेट करणारी एक भामट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात अवघ्या काही तासांच्या फरकाने एकाच पद्धतीचा वापर करून दोन हॉटेल्समधून रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. कारमधून येणाऱ्या या टोळीने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत एकूण ११,५०० रुपयांची रोकड चोरून नेली असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील ‘श्रद्धा हॉटेल व लॉज’ येथे १८ मे रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका हुंदाई एक्सेट कारमधून (क्रमांक: MH KA 51 MG 6905) तीन अज्ञात इसम आले. त्यातील एक जण कारमध्येच थांबला, तर दोघे जण रुम पाहण्याच्या बहाण्याने मॅनेजर योगेश बांबाडे यांच्याकडे गेले. एक आरोपी मॅनेजरला रुम पाहण्यासाठी वर घेऊन गेला. याच संधीचा फायदा घेत खाली थांबलेल्या दुसऱ्या आरोपीने काउंटरच्या रजिस्टरमध्ये ठेवलेली ५,५०० रुपयांची रोख रक्कम चोरली. त्यानंतर तिन्ही आरोपी कारमधून पसार झाले. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक प्रथमेश प्रभाकर घाणेकर (वय २६) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकी अशीच दुसरी घटना राजापूर तालुक्यातील ‘हॉटेल फूडलँड व लॉजिंग’ येथे १८ मे रोजीच संध्याकाळी ०४:४० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत येथे एका निळ्या रंगाच्या कारमधून चार अनोळखी इसम आले. त्यांनीही हॉटेल व्यवस्थापनाची नजर चुकवून काउंटर गाठले. या भामट्यांनी थेट हॉटेलचे एन्ट्री रजिस्टर आणि त्यामध्ये ठेवलेले ६,००० रुपये रोख लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. याप्रकरणी हॉटेल मालक शाहनवाज शरफुद्दीन ठाकुर (वय ४४) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या दोन्ही घटनांमधील साम्य पाहता ही एकच संघटित टोळी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही प्रकरणांत १९ मे रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींच्या कारचा आणि सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत आहेत.