‘कोंकणी समाज ट्रस्ट’तर्फे पावस येथील महिला वृद्धाश्रमाला धान्य देणगी
बकरी ईदचे औचित्य साधून उपक्रम
रत्नागिरी:
“सण कोणताही असो, पण गरजूंसाठी केलेली मदतच त्या सणाला खरी सार्थकता मिळवून देते.” हाच विचार कृतीत आणत एमआयडीसी, मिरजोळे येथील ‘कोंकणी समाज ट्रस्ट’ यांच्या वतीने पावस येथील ‘अनुसया आनंदी महिला वृद्धाश्रमा’तील मातांना धान्यरूपी मदत करून माणुसकीचा खरा धर्म दर्शवला आहे. आगामी पवित्र बकरी ईद सणाचे औचित्य साधून आज बुधवार, २० मे रोजी हा अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
”ज्यांच्या त्यागाने आणि संस्कारांनी आपले जीवन घडले, त्या माऊलींच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हीच खरी ईश्वरी भक्ती आहे,” या उदात्त भावनेतून ट्रस्टच्या वतीने वृद्धाश्रमातील मातांना आवश्यक अन्नधान्याची मदत सुपूर्द करण्यात आली.
या धान्य देणगी कार्यक्रमाला रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील, जिल्हा परिषद पावस गटातील नवनिर्वाचित सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी’चे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र वसंत मांडवकर, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन आणि पावस येथील सामाजिक कार्यकर्ते व मेकॅनिक असोसिएशनचे पावस विभाग अध्यक्ष महेश शेठ पालकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘कोंकणी समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष सादीक मुकादम, सचिव मोहसीन मापारी, खजिनदार हुसेनमियाॅं (बाबू शेठ) मुकादम, ज्येष्ठ सदस्य छोटू मेस्त्री, दानिश काळसेकर, फकरूद्दीन आमीनगढ़, शकील सुंबड, रिजवान भाई नदाफ आणि फैय्याज खतीब आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय वैशंपायन यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. त्यांना फुलझाडाचे रोपटे देऊन डिजिटल व पर्यावरणपूरक पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर यांचाही कोंकणी समाज ट्रस्टच्या वतीने फुलझाडाचे रोपटे देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सणासुदीच्या काळात समाजातील वंचित घटकांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याच्या ‘कोंकणी समाज ट्रस्ट’च्या या उपक्रमाचे पावस आणि रत्नागिरी परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.