पाण्याच्या कालव्यात सापडला शेतकऱ्याचा मृतदेह
गोवळकोट स्मशानभूमीजवळील घटना
चिपळूण:
चिपळूण येथील गोवळकोट स्मशानभूमीजवळील पाण्याच्या कालव्यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सनिल मोहन खापरे (वय ५४, व्यवसाय- शेती, रा. खापरेवाडी, गोवळकोट, चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ मे रोजी रात्री ९:४० वाजण्याच्या पूर्वी घडली. सनिल खापरे हे गोवळकोट स्मशानभूमी परिसरातील पाण्याच्या कालव्यात पाण्यात उपड्या अवस्थेत पडलेले स्थानिक पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका (अॅम्बलन्स) बोलावून त्यांच्या मदतीने खापरे यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची नोंद १७ मे रोजी मध्यरात्री १ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सनिल खापरे यांच्या मृत्यूचे अचूक कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.