रूम पाहण्याच्या बहाण्याने हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरून चोरटे पसार
राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढत असल्याचे चित्र समोर येत असून, सोमवारी शहरात एका धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीमधील ‘हॉटेल फुडलँड’ मध्ये चार अज्ञात इसमांनी रूम पाहण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पोबारा केला. सोमवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, हे चारही संशयित आरोपी हॉटेल फुडलँडबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गत सप्ताहात गुरुवारी आठवडा बाजाराच्याच दिवशी शहरात तीन ते चार संशयित महिला फिरत असल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी या नवीन घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. चार अज्ञात तरुण हॉटेल फुडलँडमध्ये आले. त्यांनी मॅनेजरकडे रूम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मचारी त्यांना रूम दाखवण्याच्या तयारीत असतानाच, या तरुणांनी अत्यंत चालाखीने काउंटरवरील ग्राहक नोंदणी रजिस्टर उचलले आणि तेथून पळ काढला.
हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला आहे. या घटनेनंतर हॉटेलचे मालक तथा राजापूर नगर परिषदेचे आरोग्य सभापती सुलतान ठाकूर यांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेऊन घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली व लेखी तक्रार दाखल केली.